भक्तराज पुंडलिक जीवन प्रसंग

 

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥
पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥
भक्तराज पुंडलिकाने एक विलक्षण कार्य केले आहे ते म्हणजे साक्षात वैकुंठपती परब्रम्ह परमात्मा परमभगवान यांना पंढरीस आणले आहे. भगवान पांडुरंगाने गोकुळात असताना गोपबालकांसहित गाई सांभाळण्याची विशेष लीला केली त्या सर्व गोपबालकांना घेऊन पांडुरंग पंढरीला आले आणि आपला प्रिय भक्त पुंडलिक यांच्या प्रेमाखातरं समचरण विटेवर ठेवून उभे राहिले.
भक्तराज पुंडलिक हे श्रीहरींचे अनन्यसाधारण भक्त होते. सर्व भक्त आपल्या प्रिय भगवंताला भेटण्यासाठी जातात परंतु हे वचन या ठिकाणी उलटे ठरत आहे, स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आपल्या प्रिय भक्ताच्या भेटीसाठी पंढरीला आले. भगवंत सदैव आपल्या भक्तांच्या वचनाचा मान ठेवतात. देवी देवता व मोठमोठ्या योग्यांना देखील भगवंताचे दर्शन दुर्लभ आहे. विद्वत्ता, तपस्या, योग, ध्यानधारणा अशा साधनांनीही श्रीहरींचे दर्शन होऊ शकत नाही, परंतु भक्तराज पुंडलिकाने आपल्या भक्तीच्या बळावर भगवंतांना आकृष्ट केले आणि एवढेच नाही तर नित्य काळासाठी याचं ठिकाणी उभे राहण्याची विनंतीही केली. संत तुकाराम महाराज म्हणतात…
तुका म्हणे चोर धरीला पुंडलिके | चला जाऊ कौतुके पहावया ||
पुंडलिकाने संपूर्ण सृष्टीत प्रसिद्ध असलेल्या चोराला पकडले आहे. चला चला आपण सर्वजण त्या चोराचे दर्शन घ्यावयास जाऊया.
भक्तराज पुंडलिकाच्या जीवन चरित्राविषयी सांगावयाचे झाले तर पूर्वी लोहदंड क्षेत्रात जाणुदेव नावाचे मोठे सात्विक धर्मपरायण पवित्र असे ब्राह्मण राहत होते. सदैव भगवंतांची सेवा करण्यात रत असायचे. भगवंताच्या कृपेने त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचे नाव ठेवले ‘पुंडलिक’. ब्राह्मण घराण्यात पुंडलिकाचा जन्म झाल्यामुळे सात्विक वृत्तीने भरपूर व संस्काराने परिपूर्ण जीवन होते. श्रीहरींच्या सेवेसाठी आपल्या वडिलांची मदत करायची. सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तात भगवंताची सेवा चालू करायची. असे सुंदर व पवित्र जीवन भक्तराज पुंडलिक आपल्या वैष्णव मातापितांच्या सहवासात जगू लागले. वय वाढत होते आता पुंडलिक विवाहायोग्य झाले होते म्हणून मातापित्यांनी त्यांचे लवकरच लग्न लावून दिले पण काही पूर्वसंचितकर्मामुळे पुंडलिकाच्या आचरणात बदल झाला.
पुंडलिक आता आज्ञाधारी पुत्र राहिला नसून तो आपल्या मातापित्यांच्या अपमान करू लागला. त्यांच्या कोणत्याही म्हणण्यावर लक्ष देत नसे. आपल्या पत्नीला सर्वस्व मानून तिच्याचं सेवेत लागलेला असे. अचानक पुंडलिकामध्ये झालेल्या या बदलामुळे त्याच्या मातापित्याला खूप दुःख झाले. त्यांची अवस्था मरणप्राय झाली होती. कधी कधी ते विचार करत कि घरी राहून तरी काय प्राप्त होणार आहे? मरण आले तर बरे. पण आता या मुलाची संगती नको म्हणून त्यांनी काशी यात्रेची योजना आखली. येथे मरण आल्यापेक्षा आपण काशीसारख्या पवित्र ठिकाणी शरीर सोडले तर योग्यच, असा विचार त्यांनी केला. त्यावेळी बस, रेल्वे किंवा कोणत्याही वाहनाची सोय नव्हती. कृश झालेले शरीर व संसारात तप्त झालेले मन घेऊन दोघे काशी यात्रेला निघाले. शेवटी त्यांनी पुंडलिकालाही आपल्या सोबत चालण्याची विनंती केली परंतु पत्नीआसक्त पुंडलिक त्यांच्यासोबत गेला नाही. पुंडलिकाच्या मातापित्यांनी एकटेच जाण्याची योजना केली आणि मजल दरमजल करत ते काशीच्या दिशेने निघाले.


आत्ताच काशीविषयी चर्चा झाल्यामुळे पुंडलिकाच्या पत्नीने काशी आहे तरी कशी? असा प्रश्न पुंडलिकाला केला आणि चला बरे आपणही काशीला जाऊन येऊ अशी विनंती केली पत्नीच्या विनंतीला पुंडलिक नकार देऊ शकले नाही. त्याने प्रवासासाठी एक घोडा घेतला जेणेकरून आपल्या प्रिय पत्नीला चालण्याचा त्रास होऊ नये. दोघे तरुण असल्यामुळे लगबगीने काशीच्या दिशेने निघालेल्या माता-पित्याजवळ लगेचच पोहोचले. पुंडलिकाचे माता-पिता आपल्या मुलाला व सुनेला पाहून थांबा असेही म्हणू शकले नाही आणि पुंडलिकही थांबला नाही.
काशीच्या जवळील क्षेत्रात कुक्कुटमुनींचा आश्रम होता. पुंडलिक आपल्या पत्नीसह त्या आश्रमात गेला. काही वेळानंतर त्याचे आई-वडीलही त्या ठिकाणी आले. पुंडलिक कुक्कुट मुनींच्या जवळ जाऊन त्यांना प्रश्न विचारतो की काशी येथून किती दूर आहे त्यावर कुक्कुटमणी उत्तरतात की मला काशी माहिती नाही. ‘आपण एवढे मोठे साधू आणि आपल्याला काशी कशी माहिती नाही’, ‘पुंडलिक प्रश्न करतो’. भगवतप्रेरणेने पवित्र सद्गुणी सद्विवेकी कुक्कुट मुनींना पुंडलिकाच्या मातापित्यांबरोबर झालेल्या वाईट व्यवहाराची कल्पना येते, त्यामुळे ते असे उत्तर देतात. कुक्कुटमुनींची एक विशेषता अशी होती की ते सदैव दिनदुबळ्यांची मदत करीत व सोबतच आपल्या मातापित्यांची कर्तव्यपरायण पुत्राप्रमाणे सेवा करीत असत. जन्मतः ब्राह्मण असल्यामुळे वेदांचे अध्ययन करीत. सत्य, अहिंसा, तप, ब्रह्मचर्य, गुरुसेवा, परोपकाराचे पालन करीत अत्यंत तेजस्वी असलेले कुक्कुटमुनी पुंडलिकाला काशीविषयी काहीच सांगत नाही.
संध्याकाळ झाली असते त्यावेळी पुंडलिक व त्याची पत्नी दोघेही त्या आश्रमात आश्रय घेतात. त्या ठिकाणी पुंडलिकाचे आई-वडीलही आलेले असतात. रात्र झाल्यामुळे सर्वजण त्या आश्रमात विश्राम करतात. मध्यरात्रीच्या वेळी अचानक पुंडलिकाला जाग येते आणि आश्रमाच्या उघड्या द्वाराकडे पुंडलिकाचे लक्ष जाते आणि समोरील दृश्य पाहून पुंडलिक अचंबित होतो. अत्यंत गालिच्छ व कुरूप दिसणाऱ्या तीन मुली आश्रमात प्रवेश करतात आणि आश्रमाची झाडलोट सडासंमार्जन करून तिघीही जणू काही दिव्यरूप प्राप्त झाल्या असाव्यात असे सुंदर रूप घेऊन बाहेर येतात. हे सर्व पाहून पुंडलिक स्तंभित झालेला असतो. आपले संपूर्ण धैर्य एकटवून पुंडलिक त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना प्रश्न करतो की आपण कोण आहात? त्यावर त्यातील एक जण उत्तर देते आम्ही पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या आहोत. अनेक लोक दररोज आमच्यात स्नान करून आम्हाला अपवित्र करून जातात. त्यांचे पाप आम्ही स्वीकारतो त्यामुळे आमचे सौंदर्य नष्ट होते पण या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या महातेजस्वी भगवतभक्त कुक्कुट मुनींच्या आश्रमात येऊन आम्ही सेवा करतो आणि याद्वारे आम्हाला आमचे मूळरूप प्राप्त होते. त्यावर दुसरी म्हणते की या दुष्ट साधूनिंदक, माता-पित्यांचा अपमान करणाऱ्या या पुंडलिकाला हे सर्व सांगून काय फायदा? असे शब्द ऐकून पुंडलिकाचा कंठ दाटून आला.
पुंडलिकाला आपली चूक कळाली. आपल्या वैष्णव मातापित्याची सेवा करण्याऐवजी तो त्यांचा अपमान करत होता. पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पुंडलिक म्हणाला, मी महापातकी, महापापी व दुष्ट आहे. कृपया माझा उद्धार करा असे म्हणून पुंडलिकाने तिघींच्या चरणी शरण घेतली. त्यावर गंगा, यमुना व सरस्वती यांनी पुंडलिकाला उपदेश केला की आपल्या वैष्णव मातापित्याची सेवा कर, त्यांचा अपमान करू नकोस ते सध्या याच आश्रमात वास्तव्यास आहे. आणि तुझे भाग्य थोर आहे कारण तुला महातेजस्वी सदवर्तनी भगवतभक्त कुक्कुटमुनींचे दर्शन झाले. जे स्वतः आपल्या मातापित्यांची फार सेवा करतात म्हणूनच त्यांनी तुला काशीविषयी कोणतीही माहिती दिली नाही. त्यांच्या कृपेमुळे तुला आज आमचेही दर्शन झाले आता आपल्या चुकीला सुधार.
आपण या प्रसंगाचा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. आज समाजात अनेक माता-पिता आपल्या मुलांना हरिभक्ती सोडून घरी राहून त्यांची सेवा करण्यास या प्रसंगाचा वापर करतात आणि हो जर माता-पिता वैष्णव असतील, स्वतःमध्ये ते एक कृष्णभावनाभावीत जीवन जगत असतील तर नक्कीच आपण त्यांची सेवा केली पाहिजे कारण येथे पुंडलिकाचे आई-वडील वैष्णव होते म्हणजेच कृष्णभावनाभावित होते पण आपले माता-पिता कृष्णभावनाभावित नाहीत आणि कृष्णभावनेत लागलेल्या पुत्रालाही संसारात ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकतो कारण भगवान श्रीमुकुंदांच्या सेवेत लागलेला व्यक्ती संपूर्ण ऋणमुक्त होतो असे आपले शास्त्र सांगतात. या प्रसंगाचा चुकीचा अर्थ घेऊन प्रचार केल्यापेक्षा स्वतः कृष्णभावनाभावित जीवन जगून आपण आपल्या या मनुष्य जीवनाचे सार्थक करू शकतो.
पुंडलिकाला आपली चूक समजली होती. आता त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली म्हणून आपले जीवन माता-पित्यांच्या सेवेत लावण्याचा त्याने निर्धार केला होता. पुंडलिक आपल्या आई-वडिलांना घेऊन परत आपल्या घरी येतो आणि संपूर्ण समर्पण भावनेने त्यांची सेवा करू लागतात. आता त्यांची पत्नीही त्यांची मदत करू लागली आणि अशा रीतीने पुंडलिकाने अत्यंत पवित्र असे जीवन जगण्यास प्रारंभ केला अगोदरच्या जीवनात संस्कारांची भर असल्यामुळे पुंडलिकाचे होणाऱ्या महान पतनापासून रक्षण झाले म्हणून आपणही आपल्या घरातील सर्व बालकांना परमधर्माबाबत संस्कार द्यावेत जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे मोठे संकट येणार नाही आणि ज्यांच्यावर संस्कार झाले असतात त्यांचे रक्षण होते. पुंडलिक आपल्या मातापित्यांच्या सेवेत रत असताना भगवंताच्या नाम, रूप, गुण, लीलांचे स्मरण व चिंतन करण्यामध्ये लागलेले असायचे. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितले आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
जो अनन्य भावाने माझे चिंतन करतो व माझी सेवा करतो त्या व्यक्तीचे मी रक्षण करतो व त्याला लागणाऱ्या आवश्यकतेची पूर्तता करतो. पुंडलिक माता-पित्यांच्या सेवेत दंग झाले होते आणि श्रीहरींच्या लीलांमध्ये रंगून गेले होते. यामुळे श्रीहरी पुंडलिकास भेटावयास आतुर झाले आणि त्यांनी रुक्मिणीला रुसवण्याची विशेष लीला रचली ज्याद्वारे ते पंढरीला येऊ शकतील.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top