विठ्ठल पंढरपूरला कसे प्रगटले? संपूर्ण इतिहास समजून घ्या !

भगवंत पंढरीला आले आणि पुंडलिकाला दर्शन देण्यास त्याच्या दारात उभे ठाकले. संपूर्ण झोपडी तेजाने उजळून निघाली होती जणू अनेक सूर्य एकत्र आले असावेत. श्रीहरींनी पुंडलिकाला आवाज दिला त्यावेळी पुंडलिक आपल्या मांडीवर मातापित्यांचे डोके घेऊन त्यांना झोपेचा आनंद प्रदान करत होता पण या ठिकाणी पुंडलिक जागेवरून उठले नाही त्यांनी जवळच पडलेल्या विटेला भगवंताच्या दिशेने भिरकावले आणि या विटेवर उभे राहून वाट पाहण्यास सांगितले.
या ठिकाणी पुंडलिक आपल्याला दोन शिकवणी देतात एक तर आपल्या घरी आलेल्या अतिथींचा सत्कार कसा करावा आणि दुसरं म्हणजे भगवंतापेक्षाही भक्ताचे स्थान सर्वश्रेष्ठ कसे असते बघा. स्वतः भगवंतांनी श्रीमद्भागवतात सांगितले आहे की मद्भक्ता पूजा अधिका: माझ्या भक्ताचा माझ्यापेक्षाही मोठा अधिकार आहे. कोणी अर्थाचा अनर्थ करू नये. काहीजण भगवंतांना सोडून फक्त गुरुजीची पूजा करू लागतात आणि अप्रामाणिक पंथाची सुरुवात होते. कधी कधी तर ते गुरूलाच भगवंत मानू लागतात म्हणून आपण योग्य व्यक्तीकडून समजून घेतले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. थोड्यावेळाने पुंडलिकाचे आई वडील जागे झाले लगेचच पुंडलिक लगबगीने भगवंताकडे गेला. भरपूर वेळ वाट पाहिल्यामुळे भगवंतांनी कमरेवर हात ठेवले होते. अतिसुंदर असे रूप त्या विटेवर पाहून पुंडलिक अश्रूपूर्ण नेत्रांनी बघतच राहिला.

कस्तुरी चंदनाचा टिळा, कंठात कौस्तुभमणी विराजमान, मकर कुंडलांनी सुशोभित, कमळांच्या पाकळ्यासारखे सुंदर नयन डोक्यावर मोरपीस सुशोभित होते. एका हातात कमळपुष्प तर दुसऱ्या हातात शंख घेऊन पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण थेट द्वारकेवरून भक्तराज पुंडलिकाच्या घरी येऊन विटेवर उभे राहिले असे सुंदर रूप पाहून पुंडलिकाने भगवंतांना प्रार्थना केली, ‘हे भगवंता’ असे अद्भुत दर्शन संपूर्ण जगाला लाभांन्वीत करणारे असावे अशी माझी इच्छा आहे. आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर कृपया मला असा वर द्या की ‘आपण इथे निरंतर काळासाठी उभे राहून येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दर्शन द्यावे. पुंडलिक आपल्याला या ठिकाणी विशेष शिकवण देतात की भगवंतांना आपण कधीही भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगू नये. कारण भगवंत आपले खरे मित्र आहेत.

भौतिक गोष्टी देऊन आपल्याला दुःखात टाकू इच्छित नाही. आपल्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांनी अगोदरच केलेला आहे म्हणून आपण सदैव भगवंतांच्या चरणी आपली भक्ती आणखी कशी दृढ होईल याची मागणी करावी आणि अशा प्रकारच्या मागणीने स्वतः भगवंतही प्रसन्न होतात. पुंडलिकाच्या या विशेष कृपेमुळे आजही परम भगवान श्रीहरी आपल्या सर्वांसाठी पंढरीत वास्तव्यास आहेत. भगवंत स्वयंभू प्रकट झाल्यामुळे पंढरीची विशेष महती वाढली. काही नास्तिकवादी लोक विचार करतात की ब्राह्मणांनी जाणवं घालून त्या मूर्तीला विठ्ठल नाव देऊन प्रसिद्ध केले पण स्वतः संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात.

                                      स्वयंभू आमचा विटेवरी उभा । चैतन्याचा गाभा पांडुरंग ।।
                                      नाही घडविला नाही बैसविला । पुंडलिका आला भेटावया ।।

भगवंत स्वयंभू विटेवर उभे आहेत आणि चैतन्याचा गाभा म्हणून पांडुरंगाचे वर्णन संत तुकाराम महाराज करत आहेत म्हणून कोणी नास्तिकवादी विचारांनी प्रेरित होऊन भगवंतांना एक पाषाणाची मूर्ती समजण्याचा अपराध करू नये. संत तुकाराम महाराज लिहितात..

                                   तुका म्हणे मूर्ती घडविले जे म्हणती । त्यांच्या मुखाप्रती किडे पडो ।।

संत जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करता त्यांच्या हृदयात कुणाप्रतिही द्वेष भावना नसते तर कोणी म्हणेल संत तुकाराम महाराज या ठिकाणी असे शब्द का वापरत आहेत. खरे आहे कारण संत साक्षात भगवंताचे दर्शन करतात कारण त्यांनी प्रेमाचे अंजन डोळ्यात घातलेले असते आणि नास्तिकवादी लोकांच्या डोळ्यात षडविकारांचे अंजन असल्यामुळे त्यांना भगवंत दर्शन देत नाही. संतांना परम भगवंताचे दर्शन होत असल्यामुळे त्यांना नास्तिकवादी व्यक्तींचे अपवित्र शब्द सहन होत नाहीत आणि त्यामुळे कृपावश ते अशा शब्दांनी आपल्याला सतर्क करतात.
पुंडलिकाच्या पूर्व जन्माविषयी दोन इतिहास सांगितले जातात. एक तर असा की द्वापार युगातील मुचकुंद नावाची महान पराक्रमी राजा पुन्हा भक्तराज पुंडलिक बनून येतात आणि दुसरा असा की पूर्वी द्वापर युगाच्या शेवटी पुंडलिक नावाचे महान तपस्वी विष्णू भक्तीत रत असलेले भगवतभक्त उत्तम गुणांनी परिपूर्ण ऋषी होते. दोन्हीही इतिहास शास्त्रोक्त असल्यामुळे आपण स्वीकार करतो. पुंडलिकाच्या नावावरूनच या दिंडीरवनाचे एक नाव पंढरपूर झाले. आणि या पंढरीचे नाथ म्हणून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण पंढरीनाथ म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top